रस्ते, टोल तुमच्या बापाचा नाही…! जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठकीत मंत्री संजय सावकारे संतापले
Roads, tolls do not belong to your father…! Minister Sanjay Savkare got angry at the District Development Coordination and Monitoring Committee meeting जळगाव (4 जानेवारी 2025) : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून नहींच्या अधिकार्यांना वारंवार सूचना करूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. दोन वेळा जिल्हाधिकार्यांना सूचित करूनही उपाययोजना न झाल्याने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठकीत पारा सुटला व त्यांनी नहींच्या अधिकार्यांना फैलावर घेत टोल तुमच्या बापाचा नसल्याचे सांगत फैलावर घेतले. पुढील बैठक होईपर्यंत सर्व समस्या सुटाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. शांत व संयमी असलेल्या आमदारांनी जनतेच्या प्रश्नावर अधिकार्यांना प्रथमच कठोरतेने धारेवर धरताना पाहिल्याने याबाबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे.
तर टोल नाके बंद करणार !
वारंवार नहींकडे तक्रारी करूनही महामार्गावर सुधारणा होत नाही मात्र दुसरीकडे टोल नाके सुरू करून वाहनधारकांची लूट सुरू आहे. भुसावळातील खडका गावापासून ते दीपनगरादरम्यान रस्त्यावर बेशिस्तपणे बल्कर उभे केली जातात शिवाय महामार्गावर अनेक कामे सुचवण्यात आल्यानंतरही ही कामे अनेक महिन्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने मंत्री सावकारे यांचा शनिवारच्या बैठकीत संयम सुटला व त्यांनी अधिकार्याची खरडपट्टी काढली. तुमच्या बापाचे रस्ते आणि पैसे नाहीत, असे सांगत मंत्री सावकारे यांनी पुढच्या मीटिंगपर्यंत जर महामार्गावरील समस्या कमी नाही झाल्या तर तुम्हाला टोल वसुली करू देणार नाही, टोल नाकाच बंद करू, अशी तंबी मंत्री संजय सावकारे यांनी न्हईच्या अधिकार्यांना दिली.

यांची बैठकीला उपस्थिती
जळगावच्या नियोजन भवनात शनिवार, 4 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत मंत्री रक्षा खडसे यांनी विविध विभागातील अधिकार्यांची खरडपट्टी काढली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकित, मनपा आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
अधिकार्यांची मंत्री रक्षा खडसेंनी काढली खरडपट्टी
बैठकीत केंद्रीय मंत्री खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे इंजिनियर विभाग तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस निरीक्षकांच्या कामकाजावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. रेल्वे विभागाच्या कामांची गती मंदावलेली असून त्यांचा कॉर्डिनेशन आणि कामांच्या आढाव्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे मंत्री खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच यामुळे अनेक महत्वाची कामे रखडली आहेत. पिंपळगावातील शेतकर्यांचा रस्ता बंद करण्याच्या मुद्यावरही मंत्री खडसे यांनी नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये रेल्वे विभागाने या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन या समस्यांचा लवकरात लवकर निराकरण करावे अन्यथा वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या जातील, असा इशारा खडसे यांनी यावेळी दिला.
राष्ट्रीय महामार्गाच्या पोलिस निरीक्षकांना आपल्या हद्दीची आणि कार्याची स्पष्टता नसल्यामुळे केंद्रीय मंत्री खडसे यांनी त्यांना आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले.
मंत्री खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा यांच्यात चांगल्या समन्वयाची आवश्यकता व्यक्त केली. आरओबीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. गिरणा पंपिंग रस्त्याच्या प्रलंबित कामाचे मुद्दे तसेच भुसावळच्या राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास आणि क्रॉसिंगसंबंधी कामे लांबणीवर पडली आहेत, असे खडसे म्हणाल्या.
भुसावळमध्ये अतिक्रमणाचे मुद्देही समोर आले. स्थानिक पोलिसांसह संबंधित विभागांवर कार्यवाही करण्याची खडसे यांनी सूचना दिली. बैठकीत इरिगेशन विभागाने त्यांच्याकडे निधी नसल्याने कामात अडचणी येत असल्या तरी तांत्रिक अडचणी दूर झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री खडसे यांनी या बैठकीत प्रशासनातील सुधारणा आणि कार्यप्रणालीमध्ये गती आणण्यासाठी संबंधित अधिकार्यांना कडक सूचना दिल्या.




