महाकुंभाला जाणार्या ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर विकृताने दगड भिरकावला
प्रवाशांनी ट्वीटद्वारे दिली माहिती प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव (13 जानेवारी 2025) : सुरतहून प्रयागराजकडे जाणार्या ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या एका कोचवर मनोविकृताने दगड भिरकावल्याची घटना रविवारी घडली. या प्रकाराने कोचच्या एक खिडकीचा काच फुटल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली. प्रवाशाने ट्विट करीत ही माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली तर एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
रविवारी महाकुंभ प्रयागराज ट्रेन, ताप्ती गंगा उधना रेल्वे स्टेशनवरून निघाल्यानंतर जळगाव आल्यानंतर तीन किलोमीटर अंतरानंतर बी-6 कोचवर अज्ञाताने दगड मारला. या घटनेत काच फुटला. या प्रकारानंतर डब्यातील लहान मुले व महिलांसह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे दोन ते तीन तास या प्रकरणाची माहिती कोणालाच मिळाली नसल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.


रेल्वे सुरक्षा बलाकडून संशयीताचा शोध
या कोचमध्ये पाच मुले, सहा वृद्ध, 13 महिला आणि 12 पुरुष होते. हे सर्व सुरतचे भक्त होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त ट्रेनमधील 45 टक्के लोक कुंभासाठी प्रयागराजला जात होते. दरम्यान, भुसावळात ट्रेन आल्यानंतर खिडकीचा काच तातडीने बदलून गाडी पुढील प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली.





