भुसावळातील तरुणाचा बदल्याच्या भावनेतून खून : मनमाडजवळून अटक केलेल्या चौघा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
Murder of a youth in Bhusawal out of revenge : Four accused arrested near Manmad remanded in five-day police custody भुसावळ (14 जानेवारी 2025) : शहरातील तेहरीन नासीर शेख (27) या तरुणाच्या खून प्रकरणात मनमाडजवळून पकडलेल्या चौघा आरोपींना सोमवार, 13 रोजी रात्री उशिरा भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता संशयीतांना 17 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील एक संशयीत अद्यापही पसार आहे.
मित्राच्या खूनाचा बदला घेतला हत्या करून
शहरातील शरीर सौष्ठवपटू अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) या तरुणावर पूर्व वैमनस्यातून शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला व उपचारादरम्यान बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 रोजी या तरुणाचा मृत्यू झाल्याने 17 संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खून करणार्यांमध्ये प्रमुख संशयीत तेहरीन नासीर शेख (27) असल्याने मयत पटेलच्या मित्रांनी हत्येचा बदला घेण्यासाठी तीन गोळ्या झाडत तेहरीनचा खून करीत पळ काढला होता. ही घटना शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता जाम मोहल्ला भागातील डीडी सुपर कोल्ड्रींक्स व चहाच्या दुकानात घडली होती.


पाचही आरोपी पोलीस कोठडीत
खुनातील संशयीत सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास बल्लारशहा, जि.चंद्रपूर येथून शनिवारी अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर अन्य चार आरोपींना मनमाडजवळून बाजारपेठ पोलिसांनी रविवारी अटक केल्यानंतर त्यांना सोमवारी रात्री उशिरा पोलिसांच्या सुरक्षेत न्यायालयात हजर केले असता 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अदनान शेख युनूस (29, आगाखान वाडा, भुसावळ), शेख साहील शेख रशीद (21, आगाखान वाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (31, शेरा चौक, मास्टर कॉलनी, जळगाव), सनीस नाईन मोहम्मद आसीफ (19, एमआयडीसी एरिया, जळगाव) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या कारणास्तव मिळाली कोठडी
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहनांचा करावयाचा तपास तसेच हत्या प्रकरणात वापरलेले शस्त्र कुणाकडून आणले तसेच हत्या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे याचा तपास करण्यासाठी भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षातर्फे अॅड.लक्ष्मी पावरा यांनी युक्तीवाद केला.





