विखे पाटील जिल्हाधिकार्यांनाच उद्देशून म्हणाले ; वाळू वाल्यांना सोडून द्या !
न्यूज नेटवर्क । टेंभूर्णी (22 जानेवारी 2025) : राजाश्रयाने वाळू माफियांना रान मोकळे मिळाल्याचा आरोप सर्वदूर होत असतानाच भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले वक्तव्य आता चर्चेत आले आहे. वाळूवाले आपलेच असल्याने त्यांना सोडून द्या, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. विखे पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना उद्देशून म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण होत आहे.
काय म्हणाले विखे पाटील
टेंभुर्णी येथे प्रकाश शामराव पाटील यांनी विकसित केलेल्या सुमन मल्टीप्लेक्स या अत्याधुनिक चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरस्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उद्देशून वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या, अशी टिप्पणी केल्याने भरसभेत चर्चेचा विषय ठरला. यावर पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्करांवर सरकार कारवाई करत आहे. उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, बबनराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.
