सुजय विखेंच्या मागणीनंतर साई संस्थानकडून भोजन प्रसादाबाबत झाला हा निर्णय
शिर्डी (6 फेबु्रवारी 2025) : साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्यांची हत्या झाल्यानंतर गुन्हेगारीबाबत माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मोफत भोजन बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांसाठीच असणार असून अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आज गुरुवार, 6 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
काय म्हणाले सीईओ
काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचं, तसंच भोजनानंतर परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होतो. यासारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या रोज 40 ते 45 हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणार्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.


कशी असेल व्यवस्था?
संस्थान भाविकांसाठी निवासस्थानातील निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाइकांसाठी केसपेपर, अॅडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. शालेय सहली, पालखी पदयात्रींसाठी प्रसादालय अधीक्षक खातरजमा करून विद्यार्थ्यांना, पदयात्रींना लेखी पत्र घेऊन प्रवेश देतील. नाश्ता पाकिटाचे कुपनही सकाळी दर्शन रांगेत देण्यात येणार आहेत. ते कूपन संबंधित काउंटरवर दाखवून तेथे पैसे भरून नाश्ता पाकीट मिळेल.
सुजय विखे यांनी केली होती मागणी
मोफत भोजनामुळे भिक्षेकरी व गुन्हेगार वाढल्याने भाविकांशिवाय इतरांसाठी मोफत भोजन बंद करावे, अशी मागणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती.