मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू : 84 तासानंतर बचावकार्य थांबले
पर्यावरण विभागाला नोटीस बजावण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश
पुणे (13 जुलै 2026) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोध आणि बचावकार्य सलग 84 तासांनंतर पूर्ण झाले असून या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घटनेस जबाबदार धरून संबंधित ठेकेदार कंपनी आणि पर्यावरण विभागाला नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
यांचा ओढवला मृत्यू
या दुर्घटनेत भावेश वाणी (33), अक्षय सावंत (35), सुनील कोरके (40), सन्नी माने (39), महेश कुंभार (33), नागेश गायकवाड (26), रणजित पाटील (22), राहुल गायकवाड (34), वामन कसबे (50) यांचा मृत्यू ओढवला.

नऊ निष्पाप नागरिकांचा अंत
या हृदयद्रावक घटनेवर पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करूनही 9 निष्पाप नागरिकांचा झालेला अंत मनाला सुन्न करणारा आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत वेदनादायी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
प्रशासनाची कठोर पावले व आर्थिक मदत
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी वरिष्ठ अधिकार्यांची तातडीची बैठक घेतली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देत त्यांनी ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ या संबंधित ठेकेदार कंपनीला आणि महापालिकेच्या पर्यावरण विभागाला तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
23 जण अडकले होते
8 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचर्याचा मोठा ढिगारा कोसळला. यावेळी इमारतीमध्ये 22 आणि इमारतीबाहेर एक असे एकूण 23 जण अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. उर्वरितांना वाचवण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. ढिगार्याखालील इमारत अस्थिर असल्याने अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर यंत्रांचा वापर करून काँक्रीट फोडण्यात आले व आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला.
