तिसर्या व चौथ्या मार्गासाठी भूसंपादन : दलालांकडून मोबदल्याच्या आमिषाने अतिक्रमण : भूलथापांना बळी न पडल्याचे रेल्वेचे आवाहन
भुसावळ (रविवार, 12 जुलै 2026) : भुसावळ-बडनेरा तिसरी व चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे मात्र काही स्वार्थी व्यक्ती व दलाल नागरिकांची दिशाभूल करून रेल्वे हद्दीजवळ अनधिकृत बांधकामे करण्यास प्रवृत्त करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. रेल्वेकडून मोठा मोबदला मिळेल, अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून काही ठिकाणी नव्याने बांधकामे केली जात आहेत. मध्य रेल्वे, भुसावळ विभागाने अशा अफवा आणि भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
ड्रोन व व्हिडिओ सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण
रेल्वे प्रशासनाने संपूर्ण प्रकल्प परिसराचे ड्रोन व व्हिडिओ सर्वेक्षण आधीच पूर्ण केले आहे. मार्च ते जून 2026 या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात रेल्वे हद्दीपासून 30 मीटरच्या आत रेल्वेची आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न घेता करण्यात आलेली 113 अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. यामध्ये जालंब-नांदुरा विभागात 41, नांदुरा-बिस्वा ब्रिज विभागात 62 तर बिस्वा ब्रिज-मलकापूर विभागात 10 अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

रेल्वे बोर्डाचे पत्र क्र. 2015/एलएमएल-आय/19/2 तसेच णऊउझठ मधील तरतुदींनुसार रेल्वे हद्दीपासून 30 मीटरच्या आत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे एनओसी घेणे बंधनकारक आहे. सर्वेक्षणानंतर करण्यात आलेली कोणतीही नवीन अनधिकृत बांधकामे बेकायदेशीर मानली जातील आणि अशा बांधकामांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा नुकसानभरपाई दिली जाणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
दलालांपासून सतर्क रहा
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, दलाल किंवा अन्य व्यक्तींच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक अनधिकृत बांधकामांमध्ये करू नये. अशा बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीस संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहतील. ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि नियोजन प्राधिकरणांनी रेल्वेची पूर्वपरवानगी नसताना रेल्वे हद्दीपासून 30 मीटरच्या आत कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, नागरिकांची दिशाभूल करून अनधिकृत बांधकामे करण्यास प्रवृत्त करणार्या दलाल व संबंधित व्यक्तींविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.
पैशांची मागणी करणार्या दलालांची माहिती द्या
रेल्वे हद्दीत अनधिकृत बांधकाम करण्यास कोणी प्रवृत्त करत असल्यास किंवा मोबदल्याच्या आमिषाने पैशांची मागणी करत असल्यास, नागरिकांनी याची माहिती डीआरएम कार्यालय, भुसावळ येथील भूमी व्यवस्थापन विभाग) यांच्याकडे द्यावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. मध्य रेल्वे, भुसावळ विभाग नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करीत आहे की, रेल्वे हद्दीत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक रेल्वे परवानगी (एनओसी) घ्यावी आणि अफवा, भूलथापा किंवा मोबदल्याच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.
