पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन : 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटे वीज बंद करून दिवे लावा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा देशवासीयांना रविवार, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व वीजपुरवठा बंद करून दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी ट्वीट करुन नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशवासीयांना एका व्हीडिओच्या माध्यमातून संदेश देईन. त्याप्रमाणे, मोदींनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधला. अंधःकारमय संकटाला पराभूत करण्यासाठी आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवलं पाहिजे व घंटी वाजवून, थाळ्या वाजवून लोकांनी दाखवून दिलं की, कोरोना व्हायरसविरोधात देश एक होऊन लढू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.
प्रत्येकजण एकमेकांसोबत
पंतप्रधान म्हणाले की, आपण लॉकडाऊनदरम्यान घरात नक्कीच आहोत, मात्र आपल्यातला कुणीच एकटा नाहीय. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे. कोरोनामुळं निर्माण झालेल्या संकटातून गरिबांना पुढे घेऊन जायचंय, प्रकाशाकडे त्यांना न्यायचे असल्याने रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून रात्री 9 वाजता 9 मिनिट घरातली सर्व वीज बंद करा आणि घराच्या दारात किंवा बाल्कनीत उभं राहून मेणबत्ती किंवा मोबाईलची लाईट लावा. आपण एकजुटीनं लढतोय, हे त्यातून दिसेल. कुणीही कुठेही एकत्र जमा व्हायचं नाही, तुमच्या घराच्या बाल्कनीतूनच हे करायचे आवाहनही त्यांनी केले आहे.

