एरंडोल तालुक्यात अवैध सावकारी : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
एरंडोल (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : एरंडोल तालुक्यातील तिघांविरुद्ध अवैध सावकारीप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने अवैध सावकारी करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. सहकारी संस्था विभागाकडून प्राप्त अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
एरंडोलच्या सहकार अधिकारी श्रेणी-1 तथा सहाय्यक निबंधक संगीता चंद्रकांत साळुंखे (53) यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यावरून संशयीत संजय रामदास महाजन, रामदास गजमल महाजन आणि सुनील रामदास महाजन (सर्व रा.तळई, ता.एरंडोल, जि.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध सावकारीचा अहवाल येताच कारवाई
कथित अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकारी संस्था विभागाकडून चौकशी व अहवाल प्राप्त झाले होते. या अहवालांच्या अनुषंगाने फिर्याद दाखल करण्यात आली. तक्रारीत संशयितांपैकी एक जण माजी सैनिक व शासकीय नोकरदार असल्याचा तर दुसरा भाऊ शिक्षक असून कथित अवैध व्यवसायात मदत करत असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. ही घटना 4 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता एरंडोल येथील न्यू लक्ष्मी नगर परिसरात घडल्याचे नोंदीत नमूद आहे. या प्रकरणी शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.45 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक शंकर पवार करीत आहेत.


