चार हजारांची लाच घेताना रावेरचा भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
पैसे नसल्यास चणे स्वीकारण्याचीही आारोपीची तयारी : लाचखोर हादरले
भुसावळ (27 मार्च 2025) : सामायीक शेतजमिनीत मोजमापाच्या खुणा दर्शवण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना रावेरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (48, भुसावळ) यास जळगाव एसीबीने अटक केली. निंभोरा, ता.रावेर गावातील स्मशानभूमीजवळ ही कारवाई बुधवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपीने तक्रारदाराकडे पैसे नसल्यास चणे (हरभरे) स्वीकारण्याचीही तयारी दर्शवली हे विशेष !
असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदाराने 4 मार्च 2025 रोजी तक्रार नोंदवली होती. तक्रारदार व त्यांचे काका यांची मस्कावद, ता.रावेर येथे सामायीक शेतजमीन असून त्यासाठी त्यानी भूमी अभिलेख कार्यालय, रावेर येथे 7 जानेवारी रोजी अर्ज करून शासकिय फी भरली होती. त्यानंतर यातील आरोपी कुलकर्णी याने 18 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष शेतात येवून जमिनीचे मोजमाप केले होते. त्यावेळी तक्रारदाराला केलेल्या मोजमापाच्या खुणा दाखविण्यासाठी पाच हजार पाचशे रुपयांची लाच मागण्यात आली मात्र तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर शेतातील चण्याचे (हरभरे) पीक आहे व पैशांच्या बदलत्या हरभरे द्यावेत, असे देखील सांगितल्याने तक्रारदाराने 4 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली.

दोन वेळा लाचेची पडताळणी
4 मार्च व 25 मार्च 2025 रोजी एसीबीने लाच पडताळणी केली व त्यात आरोपी कुलकर्णी याने चार हजारांची लाच मागितल्याचे तसेच पैसे नसल्यास लाच स्वरुपात हरभरे स्वीकारण्याचे मान्य केल्याने सापळा रचण्यात आला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास निंभोरा गावातील स्मशानभूमीजवळ तक्रारदाराला बोलावल्यानंतर आरोपी कुलकर्णी याने लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यास अटक केली. आरोपीच्या अंग झडती लाच रक्कमे व्यतिरिक्त मोबाईल तसेच तीन हजार 600 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीच्या भुसावळातील घराच्या झडतीत काहीही सापडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




