अंजदे शिवारात ट्रॅक्टर उलटून अपघात : मारूळचा चालक ठार
रावेर (27 मार्च 2025) : भरधाव वेगाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगललला धडकून उलटून झालेल्या अपघातात मारूळचा ट्रॅक्टर चालक ठार झाला. रावेर तालुक्यातील अजंदे शिवारात हा अपघात घडला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. विजय रमेश तायडे (45, मारूळ) असे मयताचे नाव आहे.
असा घडला अपघात
सावदा येथील भीमराव मेढे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 पी.4468) हे विवरा, तालुका रावेर येथील घनश्याम हरणकर यांच्याकडे माती वाहतुकीसाठी कामावर लावण्यात आले होते. या ट्रॅक्टरवर चालक विजय रमेश तायडे (45) हे बुधवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन विवरा येथून अजंदेकडे भरधाव वेगाने जात असताना पांडुरंग शिवदास पाटील यांच्या शेताजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी अँगलला धडकून उलटले. या अपघातात चालक विजय तायडे हा जागीच ठार झाला. याबाबत भीमराव मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.





