मध्यप्रदेशातील त्या तरुणाची आत्महत्या : प्रकरण अंगलट न येण्यासाठी नदीकाठी टाकला मृतदेह
रावेर (30 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील सुकी नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह आढळला होता. सुरूवातीला घातपाताची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास सुरू असताना मयताने आत्महत्या केली मात्र संशयीताच्या घराजवळ हा प्रकार घडल्याने प्रकरण आपल्यावर शेकले जाईल या भीतीने त्यांनी मृतदेह सुकी नदीपात्रात टाकल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
एरंडोल तालुक्यातील दापोरी येथे हातमजुरी करणारा सुरेश सुमर्या बारेला (वय 25, रा.कलोरी, जि.खंडवा म.प्र.) हा पत्नी चंपीबाई व मुलाबाळांसह पिंपरकुड पाड्यावर सासुरवाडीत आला. त्याने तेथे झाडाला गळफास घेऊन 20 मार्च आत्महत्या केली होती. आपल्या घराजवळ आत्महत्या केलेला इसम गावातील जावई असल्याने नाहक आपल्यावर घातपाताचा संशय नको म्हणून काही जणांनी हा मृतदेह सुकी नदी पात्रातील पालच्या कच्च्या रस्त्याजवळ आणून ठेवला. दरम्यान, या अनोळखी मृतदेहाची बुधवावर, 26 रोजी ओळख पटली मात्र शवविच्छेदन अहवाल आणि मृतदेहाच्या मानेवरील व्रण पाहता फैजपूर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी तपासाला वेग दिला.

मृतदेह हलविल्याप्रकरणी मयताची पत्नी चंपीबाईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात वरील सातही जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरसिंग कर्ता बारेला, तेजसिंग करम्या बारेला, सीताराम कजम्या बारेला, संजय रेजला बारेला, रेजला गोटा बारेला, धिचल सीताराम बारेला, बारसिंग नावडा बारेला (सर्व रा.नवीन नवाड, पिंपरकुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.




