मुक्ताईनगर तालुका खुनाने हादरला : शेतजमिनीच्या वादातून तरुणाची हत्या
मृतदेहासह दुचाकी टाकळी शिवारात टाकली : दोघा संशयीतांना अटक
Muktainagar taluka shaken by murder : Youth killed over agricultural land dispute भुसावळ (30 मार्च 2025) : शेतजमिनीच्या जुन्या वादातून चुलतभावाने तरुणाचा हत्यारांनी वार करून खून केला व मृतदेहासह दुचाकी टाकळी शिवारात टाकल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी शनिवारी मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरोधात खुनाचा करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सुनील रामसिंग चव्हाण (32, टाकळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शेतजमिनीच्या वादातून हत्या
सुनील चव्हाण हा तरुण परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाणसोबत सुनील चव्हाण यांचा शेतजमिनीचा जुना वाद होता. मंगळवार, 25 मार्च रोजी सायंकाळी सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.सी.4473) ने गेल्यानंतर परतलाच नाही मात्र शोध सुरू असताना 26 मार्च रोजी पहाटे सहा वाजता टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनील चव्हाणचा मृतदेह व दुचाकी आढळली.

मयत सुनीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना मुक्ताईनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपास पोलीस नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.




