मामाकडे आलेल्या भाचीची आत्महत्या
पारोळा (31 मार्च 2025) : गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्त मामाकडे आलेल्या तरुणीने अर्थात भाचीने गळफास घेतला. ही घटना गुरुवार, 27 रोजी रात्री घडली तर हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पायल संतोष शिंदे (18, रा.पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे.
काय घडले नेमके
मुलीचे मामा सतीश सुखदेव सोनवणे (रा. भोंडण) यांनीं पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांची भाची पायल संतोष शिंदे (18, रा.पाथर्डी फाटा, नाशिक) ही मराठा कॉलेज, उत्तमनगर, नाशिक येथे इयत्ता 12 वी चे शिक्षण घेत होती. ती गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या कालावधीत मामाकडे भोंडण येथे आली असता गुरुवार, 27 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घरातील कुटुंबीय जेवण करुन झोपून गेले. तिचा मामा दि.28 रोजी सकाळी 4.15 वाजेच्या सुमारास जागी झाला असता त्याची भाची ही छताच्या लोखंडी पाईपला खाटीच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेली दिसली.

लागलीच पायल हिस ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकामी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे घेवून गेले असता तेथील डॉक्टरांनी पायल हिस तपासुन मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.




