नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात निंभोर्यातील तरुण ठार
नशिराबाद (31 मार्च 2025) : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निंभोर्यातील तरुण जागीच ठार झाला तर त्याचा जुळा भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात नशिराबाद उड्डाणपुलावर सोमवार. 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. चैतन्य सुपडू फेगडे (26, रा.निंभोरा, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.
काय घडले नेमके
रावेर तालुक्यातील निंभोरा गावातील रहिवासी चैतन्य सुपडू फेगडे हा तरुण भाऊ चेतन, आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. घरकुल योजने संदर्भातची फाईलच्या कामानिमित्ताने चैतन्य हा जुडवा भाऊ चेतन व वडील यांच्यासोबत सोमवार, 31 मार्च रोजी जळगाव जाण्यासाठी निघाले. चैतन्यचे वडील रिक्षाने पुढे निघाले तर चेतन आणि चैतन्य हे दोघे भाऊ दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ईई 1702) ने भुसावळकडून जळगावकडे येत असताना नशिराबाद गावातील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी डिव्हायडर जोरदार धडकली. या अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ चेतन फेगडे हा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी.मनोरे यांचय मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस कर्मचार्यांनी घटनांसाठी धाव घेऊन पंचनामा करून जखमी झालेल्या चेतनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत चैतन्य हा एक वर्षापूर्वी रेल्वे विभागात नोकरीला लागल्याची माहिती आहे.




