एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या अल्पवयीन बालकाची हत्या : शेतात आढळला मृतदेह


Murder of a minor boy from Ringangaon in Erandol taluka: Body found in a field एरंडोल (17 जून 2025) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाची हत्या करीत मृतदेह शेतात टाकण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तेजस गजानन महाजन (13, रा.रिंगणगाव, ता.एरंडोल) असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, ही हत्या नरबळीतून झाल्याचा संशय असून तिघांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

बेपत्ता बालकाचा मृतदेहच आढळला
तेजस हा रिंगणगाव येथे आई, वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवतात. सोमवार, 16 जून रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा 13 वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवले व कामानिमित्त ते जळगावी गेले.


तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र तेजस घरी न आल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. एरंडोल पोलीस स्टेशनला कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवीत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता. अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे. अल्पवयीन बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास सुरू असून काहींना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !