घरच्यांवर रागावून मुंबईत पळून जात असलेल्या तीन अल्पवयीन युवतींना भुसावळात आरपीएफने घेतले ताब्यात

भुसावळ विभागाकडून 'नन्हे फरिश्ते' ऑपरेशन यशस्वी


भुसावळ (12 जुन 2025) : घरी वाद झाल्याने कुटुंबातील सदस्यांवर नाराज हाेऊन काेणालाही काहीही न सांगता मुंबई मायानगरीत जात असलेल्या तीन अल्पवयीन मुलींना कुशीनगर एक्स्प्रेसमधून रेल्वे सुरक्षा बलातर्फे (आरपीएफ) ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. नन्हे फरिश्ते अंतर्गत ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलातर्फे करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘नन्हे फरिश्ते’ या ऑपरेशन अंतर्गत घरून पळून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना वाचवत बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या तत्पर कारवाईमुळे एक गंभीर घटना टळली आहे. १० जून रोजी मुख्य सुरक्षा आयुक्त गाेरखपूर यांच्या कडून भुसावळ येथील आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जाेशी यांना माहिती मिळाली की, २२५३७ अप कुशीनगर एक्सप्रेसमधून तीन अल्पवयीन मुली घर सोडून मुंबईला पळून जात आहेत. या मुलींबाबत एफआयआर देखील दाखल होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेत, भुसावळचे निरीक्षक पी.आर.मीना यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. या पथकात एएसआय दीपक कव्हले, एएसआय दीपक तायडे, अनुज कुमार, महिला आरपीएफ संजना साहू, भूषण पाटील आणि शिवानंद गीते यांचा समावेश होता.


या पथकाने अप कुशीनगर एक्सप्रेस भुसावळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दाेन वर येताच, जनरल कोचची कसून तपासणी केली.त्यावेळी फोटोमध्ये दिसलेल्या तीनही अल्पवयीन मुली तिथे आढळून आल्या. चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, त्या घरातून रागावून, कोणालाही न सांगता मुंबईला जात होत्या आणि त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. या मुलींना तात्काळ गाडीमधून उतरवून आरपीएफ ठाण्यात आणले. त्यानंतर आधार बहुउद्देशीय संस्थेकडे साेपविण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक सुनील जगन हिवाळे आणि दिपाली हिवाळे उपस्थित हाेते.

कुशीनगरमधून खाली उतरविलेल्या मुलींमध्ये साेनल वय १७, (नाव बदललेले), श्रेया (वय १७), रेखा (वय १४) (रा. टेकुआटार खैरेटवा, पोलीस स्टेशन – रामकोला, जिल्हा – कुशीनगर, उत्तर प्रदेश) मुलींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुलींची आराेग्य तपासणी ट्रामा केअर सेंटरमध्ये केले. दीपक कव्हले यांनी या मुलींना बाल कल्याण समितीत दाखल केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !