40 हजारांची लाच भोवली : धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी भोवली लाच : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ
गणेश वाघ
₹40,000 Bribe Lands Them in Trouble: Police Sub-Inspector and Staff from Dhule’s West Deopur Police Station Caught in ACB Trap भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात 50 हजारांची लाच मागून 40 हजारात तडजोड करीत पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारणार्या पोलीस उपनिरीक्षकासह अन्य कर्मचार्याला धुळे एसीबीने अटक केली आहे. हा सापळा सोमवारी सायंकाळी उशिरा पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात यशस्वी करण्यात आला. पोलीस ठाण्यातच झालेल्या लाचेच्या कारवाईने धुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (36) व पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (31) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदार यांच्या सासर्याचे वलवाडी, ता.धुळे येथे स्वतःचे घर असून धुळेस्थित दाम्पत्याने या घराच्या कागदपत्रांचा वापर करून 2015 मध्ये एका फायनान्स कंपनीकडून 36 लाख 10 हजारांचे कर्ज काढले. तक्रारदाराच्या सासर्याची या प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर त्यांनी धुळे न्यायालयात अर्ज केला व सदर प्रकरणात तक्रारदार यांच्या सासर्याच्या बाजूने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 50 हजारांची लाच आरोपी पोलीस उपनिरीक्षक तळेकर यांनी 3 रोजी मागितल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवून लाच पडताळणी करण्यात आली.
पोलीस ठाण्यातच स्वीकारली लाच
धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. आरोपी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर (36) यांच्यासाठी पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (31) याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली व तक्रारदाराचा इशारा मिळताच सादरे यांना सुरूवातीला व नंतर तळेकर यांना पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यातच सापळा यशस्वी झाल्याने धुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.
लाचखोरांविरोधात द्या बिनधास्त तक्रार
शासकीय काम करून देण्यासाठी कुणी लाच मागत वा देत असल्यास धुळे एसीबीशी 02562-234020 वा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.
