धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरण : नांदेडहून तिसरा संशयीत ताब्यात

मुख्य संशयीत किशोर पाटलाची पोलिसांकडून कसून चौकशी


Dhule Rest House robbery case : Third suspect arrested from Nanded धुळे (12 जून 2025) : धुळ्यातील शासकीय रेस्ट हाऊस गुलमोहरच्या 102 क्रमांकाच्या खोलीत सापडलेल्या एक कोटी 84 लाखांच्या घबाड प्रकरणी पोलिसांनी नांदेड येथून गौतम नारायण वाघमारे (43, सध्या रा.पनवेल, मूळ गाव मुखेड, नांदेड) यास ताब्यात घेतले आहे शिवाय मुख्य संशयीत किशोर पाटील यालादेखील चौकशीकामी धुळ्यात आणण्यात आले आहे.

धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या कक्षात तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोलनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार गोटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.


या प्रकरणात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पाटील यांचे निलंबनही करण्यात आले असून, या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची घोषणा केली आहे.

सीसीटीव्हीद्वारे अधिक तपास
धुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा कसून अभ्यास केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणार्‍या व्यक्ती नेमक्या कोण होत्या, दिसत गाड्या कोणाच्या होत्या आणि या व्यक्ती गुलमोहर शासकीय विश्रामगृहात का आल्या होत्या? याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या इतर व्यक्तींनाही ओळखून त्यांना तपासामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच, आरोपींचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) देखील पोलिसांना प्राप्त झाले असून त्यातून अधिक धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !