लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण : पाचोर्यातील महिला डॉक्टरांचा अपघाती मृत्यू

Dream of pursuing higher education in London unfulfilled : Accidental death of female doctor from Pachora पाचोरा (18 जून 2025) : लंडनला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून कागदपत्रांची पूर्तता करून माहेरी पाचोर्याकडे निघालेल्या महिला डॉक्टरांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ.स्नेहल प्रीतम रावते (24) असे मयताचे नाव आहे. सोमवार, 16 जून रोजी रात्री जामनेर तालुक्यात शेंदूर्णीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
असा घडला अपघात
जामनेर येथे 16 जून रोजी डॉ. स्नेहल या त्यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्यासोबत पासपोर्टसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांना देण्यासाठी गेल्या होत्या. कामे आटोपून जामनेर ते पाचोरा या परतीच्या प्रवासात रात्रीच्या सुमारास शेंदुर्णी, ता.जामनेरजवळ एका भरधाव वेगाने येणार्या वाहनाने पेंढारकर यांच्या वाहनाला दिलेल्या धडकेत स्नेहल रावते यांना चिरडले.

घटनास्थळी ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली तसेच जवळच्या पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दुर्दैवाने, स्नेहल यांचे वडील किशोर पेंढारकर यांच्या डोळ्यांदेखतच ही घटना घडल्याने कुटुंबाचा आक्रोश ऐकून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. स्नेहल ही पाचोरा येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील होती. तिच्या अकाली निधनाने पाचोरा परिसरात शोककळा पसरली आहे.
