भुसावळात तिरंगा रॅलीतून शहिद विरांचे स्मरण
शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या तिरंगा रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ (27 जुलै 2025) : कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून शनिवारी शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलने एका अत्यंत प्रेरणादायी तिरंगा रॅलीचे यशस्वी आयोजन केले. देशभक्तीच्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या या रॅलीमध्ये बियाणी मिलिटरी स्कूलचे असंख्य विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या शिस्तबद्ध आणि उत्साही सहभागाने संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून सोडले. कारगीलच्या शूरवीरांच्या अदम्य त्यागाचे स्मरण केले आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.
देशभभक्तीच्या घोषणांनी शहर दणाणले
शनिवारी सकाळी ठीक 10 वाजता जुन्या एचडीएफसी बँकेच्या जवळून या ऐतिहासिक रॅलीचा शुभारंभ झाला. भगव्या, पांढर्या आणि हिरव्या रंगांनी नटलेले विद्यार्थी, त्यांच्या खांद्यावर तिरंगा घेऊन, ’भारत माता की जय’, ’वंदे मातरम’, आणि ’अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकत होते. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा उत्साह आणि घोषणांमधील जोश संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत होता. त्यांच्या हातातले तिरंगे अभिमानाने डोलत होते, जणू ते शूर जवानांच्या शौर्याला सलामी देत होते. रॅली ज्या मार्गाने जात होती त्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी मिलीटरीच्या गणवेशातील 300 विद्यार्थी रॅलीत सामील झाले होते.






यांचा रॅलीत सहभाग
यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणी, पियुष बियाणी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, महेंद्रसिंग ठाकूर, भारती ठाकूर, डॉ.छाया फालक, राजीव पारीख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रॅलीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, माजी नगरसेवक, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभाग घेतला होता.
या मार्गाने काढली रॅली
रॅलीने भुसावळच्या प्रमुख रस्त्यांवरून जामनेर रोड आणि अष्टभुजा मंदिर मार्गाने काढण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, दुकानदार आणि ज्येष्ठ नागरिकही आपल्या घराबाहेर येऊन रॅलीचे आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रभक्तीचे कौतुक करत होते. अनेकांनी टाळ्यांच्या गजरात आणि ’जय हिंद’ च्या घोषणांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. रॅलीचा उद्देश केवळ कारगिलच्या शहिदांना आदरांजली वाहणे हाच नव्हता, तर युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि देशाप्रती कर्तव्य भावना रुजविणे हा देखील होता.
स्मारकाजवळ समारोप
सकाळी 10 वाजता निघालेल्या या रॅलीचा समारोप शहीद राकेश शिंदे स्मारकाजवळ शूरवीरांना आदरांजली अर्पण करून, त्यानंतर नाहाटा चौकात झाला. समारोपप्रसंगी बोलताना बियाणी मिलिटरी स्कूलच्या प्राचार्य डी.एम. पाटील कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. या रॅलीमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे देशभक्तीमय झाले होते. या रॅली आयोजनाबद्दल नागरिकांनी बियाणी मिलिटरी स्कूलच्या कार्याचे कौतुक केले.







