पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीतच ; सात गाड्या धावताय विलंबाने !
Rain disrupts rail traffic ; seven trains running late ! भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या अपमार्गावरील सात गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागत आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या धावताय उशिराने
भुसावळ रेल्वे स्थानकावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. यात गीतांजली एक्सप्रेस 4 तास, पठानकोट एक्सप्रेस 2, पवन एक्सप्रेस 3, दानापूर-पुणे एक्सप्रेस 2, शालीमार एक्सप्रेस 3,40 मिनीटे, हावडा मेल 3 तास आणि गुवाहाटी एक्सप्रेस 5 तास या गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्या तर अर्धा तास, एक तासांच्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गाडीची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर आणि प्रतिक्षा कक्षात ताटकळत बसावे लागत आहे.

रेल्वे रूळांवर साचले पाणी
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांचा वेग कमी करण्यात येत असल्याने गाड्या विलंबाने धावतात, मुंबईकडून येणार्या गाड्या सुध्दा नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने भुसावळ जंक्शनवर पोचत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपल्या गाडीची सद्यस्थिती जाणून घ्यावी, असे सांगितले आहे.




