दीपनगरात एमएसएफची कारवाई : 20 किलो तांब्याची तार चोरीचा डाव उधळला : पिंप्रीसेकमचे दोघे कामगार जाळ्यात


दीपनगर (शुक्रवार, 31 जुलै 2026) : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या 500 मेगावॅट प्रकल्पात महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ)च्या सुरक्षा कर्मचार्‍यांमुळे 20 किलो तांब्याची तार चोरीची डाव उधळला गेला. दोन संशयीताना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय विजय पाटील व शिवम बाळू सोनवणे (दोन्ही रा.पिंप्रीसेकम, ता.भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे असून ते कामगार असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण ?
27 जुलै रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास प्रकल्पातील मोटारसायकल पार्किंग परिसरात काही संशयित व्यक्ती चोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती सुरक्षा रक्षक समाधान कोळी यांनी सुरक्षा पर्यवेक्षक संतोष खैरनार यांना दिली. माहिती मिळताच संतोष खैरनार, योगेश्वर बच्छाव आणि राहुल महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा पथक येत असल्याचे लक्षात येताच दोन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला; मात्र अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले.

बॅगेत आढळली तांब्याची तार
घटनास्थळाची कसून पाहणी करताना सुरक्षा पथकाला एक संशयास्पद बॅग आढळून आली. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 20 किलो वजनाची जुनी तांब्याची तार आढळली. जप्त करण्यात आलेल्या या तारांची अंदाजे किंमत 14 हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएफच्या सुरक्षा पथकाने स्वतंत्र तपास सुरू ठेवला.
अवघ्या तीन दिवसांत केलेल्या सातत्यपूर्ण चौकशीत 30 जुलै रोजी दोन्ही संशयितांचा शोध घेण्यात सुरक्षा पथकाला यश आले.

चौकशीदरम्यान त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. दोघांना मुद्देमालासह भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुरक्षा पर्यवेक्षक संतोष नथ्थू खैरनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेश चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !