श्रीमद भागवत : मानवमुक्तीचा महामार्ग : श्रीकांत महाराज सराफ
यावलला पहिल्या दिवसाच्या प्रवचनात उलगडले भागवताचे वैशिष्ट्य
Shrimad Bhagwat: The Highway of Human Liberation: Shrikant Maharaj Saraf यावल (2 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सोमवारपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. श्रीकांत महाराज सराफ यांच्या प्रवचनाने सप्ताहाचा पहिला दिवस अध्यात्मिक रंगात रंगून गेला. या दिवशी महाराजांनी श्रीमद भागवताच्या प्रथम ते तृतीय स्कंधांवर सखोल विवेचन केले.
भागवत हे तर तर मानवमुक्तीचा महामार्ग
भागवताचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना प्रवचनात महाराज म्हणाले की, श्रीमद्भागवत हे केवळ पुराण नाही तर मानवमुक्तीचा महामार्ग आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या त्रिसूत्रीचा संगम भागवतात आहे. भागवत ऐकल्याने अंतःकरण शुद्ध होते, पापबंधन नष्ट होतात आणि आत्मा ईश्वराशी एकरूप होतो.

पहिल्या दिवसाचे विवेचन
प्रथम स्कंधात भगवान वेदव्यासांनी महाभारत-पुराणरचनेनंतरही अंतःकरणी असलेले शून्य नारदांच्या मार्गदर्शनाने भागवत रचून पूर्ण केले. यावर बोलताना महाराजांनी सांगितले की, सत्संगाचे महत्त्व आणि हरिनामस्मरणाची आवश्यकता येथे अधोरेखित होते.
तृतीय स्कंधातील मैत्रेय-विदुर संवाद हा जीवनातील तात्त्विक प्रश्नांना उत्तरे देणारा अमूल्य संवाद आहे. कर्दम ऋषींचे चरित्र हे संयम, तपस्या व ईश्वरभक्तीचे उत्तम उदाहरण असून आजच्या पिढीला त्यातून आदर्श घ्यावा, असे सराफ महाराजांनी प्रतिपादन केले.
उपस्थितांची भावना
सप्ताहाच्या प्रारंभीच ग्रंथातून आलेल्या तत्त्वज्ञानामुळे उपस्थित भाविक भारावून गेले. प्रवचनाच्या ठिकाणी भक्तांचा मोठा जनसागर जमला होता. भागवत ऐकण्यानेच जीवन्मुक्ती प्राप्त होते, हा अनुभव पहिल्या दिवसापासूनच भाविकांना येऊ लागल्याचे अनेकांनी नमूद केले.
कर्दम ऋषींची कथा
कर्दम ऋषींनी दीर्घ तपश्चर्या करून भगवान विष्णूंचे दर्शन घेतले. त्यांना देवकन्या देवहूती पत्नी म्हणून प्राप्त झाली. त्यांच्या जीवनातून संयम, तपश्चर्या आणि ईश्वरभक्ती यांचे महत्त्व अधोरेखित होते.
मैत्रेय-विदुर संवाद
विदुरांनी भगवानाची खरी ओळख काय, जीवात्म्याचा ईश्वराशी संबंध कसा आहे, संसारातून मुक्ती कशी मिळते हे प्रश्न मैत्रेय ऋषींना विचारले. या संवादातून ज्ञान, तत्त्वज्ञान आणि भक्तिमार्गाचे महत्त्व उलगडते.




