गुरु-शिष्यांच्या तबला-वादनातून ‘नादब्रह्मा’ची अनुभूती ; 40 तबलजींची अनोखी गणेशवंदना
सांस्कृतिक उपक्रम : जय गणेश फाउंडेशनच्या कला उत्सवाला रसिकांनी दिली दाद
Experience the ‘Nada Brahma’ through the tabla playing of Guru-Shishya ; Unique Ganesh Vandana by 40 Tabla players भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या सुरभी नगरातील नवसाचा गणपती उत्सवात सोमवारी गुरु-शिष्यांच्या सामूहिक तबलावादनातून गणेशवंदना हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात भुसावळ शहरातील 40 तबलजींनी तबला आणि डग्गावर थाप देऊन ठेका, कैडा, तुकडा अशा रचना मधूर तालात वाजवल्या. त्यातून रसिकांना नादब्रह्माची अनुभूती मिळाली. शहरात अशाप्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला. विविध वयोगटातील तबलजींनी प्रारंभी विघ्नहर्ता गणरायाची स्तुती करताना अर्धा तास विविध कायदे आणि पलटे सादर केले.
गणरायाची सामूहिक आरती
अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची होती. तबला वादनात निष्णात असलेले मनोज कुलकर्णी, शिरीष जोशी यांच्या मार्गदर्शनात हा अनोखा कार्यक्रम झाला. तेजस मराठे, महेंद्र सूर्यवंशी, मयूर शहा, तेजस बालाजीवाले यांच्या विद्यार्थ्यांनी वादनात सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमात गायन साथ जितेश मराठे, किरण सोहळे, आरती मोरे यांनी केली.

सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले. सर्व सहकारी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे, समन्वयक गणेश फेगडे यांची उपस्थिती होती. ‘अंतर्नाद’ या जागतिक विक्रम कार्यक्रमात सादर झालेल्या ‘हरि सुंदर नंद मुकुंदा’ या गीतावर तबला वादकांसह रसिकांनी ताल धरला. ‘जयोस्तुते गणपती जगवंदन’ या नांदीने कार्यक्रमात उत्साहाचे रंग भरले. कार्यक्रमाच्या शेवटी गणरायाची सामूहिक आरती करण्यात आली. जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे कोषाध्यक्ष दगडू पाटील, हर्षल वानखेडे, विशाल आहुजा, राहूल भावसेकर, ओम चौधरी, आर्य नेमाडे, समीर पिंजारी यांच्यासह फाउंडेशनच्या टिमने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
तबल्याचे महात्म्यही सांगितले
भारतीय संगीत हे स्वर, ताल व लय या तत्वावर आधारित आहे. कोणत्याही कलेच्या परिपूर्तीसाठी, स्वराबरोबर लयसुद्धा महत्वाची असते. काल-मापनावरच संगीत अवलंबून असते. ताल हा संगीताचा प्राण आहे. गायनातील सर्वच शैलींच्या साथीसाठी तबल्याचा उपयोग केला जातो आहे. ख्याल गायन, ठुमरी, गझल, टप्पा, दादरा, भावगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत, भक्तिगीत इत्यादी गीतप्रकारांच्या साथीसाठी इतर अवनद्ध वाद्यांपेक्षा ‘तबला’ ह्या वाद्यालाच प्राधान्य दिले जाते. किंबहुना धृपद-धमाराच्या साथीसाठी पखवाज उपलब्ध झाला नाही तर तबला हे वाद्य घेऊन साथ केली जाते अशी माहिती ओघवत्या शैलीत तबला शिक्षकांनी या कार्यक्रमात दिली.




