भुसावळात विद्यार्थ्यांनी चालवली शाळा : अहिल्यादेवीत शिक्षक दिन उत्साहात
Students run a school in Bhusawal: Ahilyadevi is excited about Teachers’ Day भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात महान शिक्षक, देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत शाळेचे दिवसभराचे संपूर्ण कामकाज इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीनी पाहिले.
विद्यार्थिनींनी चालवली शाळा
प्रत्येक वर्गावर विविध विषयांच्या तासिका घेण्याचे काम, शाळेची घंटा वाजवायचे काम दहावीच्या विद्यार्थिनीनी केले तसेच शाळेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक, शिपाई यासारख्या जबाबदार्यादेखील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीनी सांभाळल्या. याशिवाय मधल्या सुट्टीत शाळेतल्याच विद्यार्थिनींच्या माध्यमातून. पाणीपुरी, वडापाव, कचोरी, समोसा, नुडल्स, पास्ता अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले.

विद्यार्थिनींनी या खाद्यपदार्थांचा आस्वाद मधल्या सुट्टीत घेतला. याशिवाय शाळेतल्या विद्यार्थिनींच्या मदतीने टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध वस्तूंचे सुंदर हस्तकला प्रदर्शन भरवले. संस्थेचे चिटणीस उषा पाटील यांनी यांनी दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले.. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन दाखवण्यात आले. आजच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून चालविण्यात आलेल्या शाळेच्या पर्यवेक्षिका म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातून दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली जिगिशा निकम या विद्यार्थिनीने कामकाज पाहिले तर एक दिवसाची मुख्याध्यापिका म्हणून नववीच्या सर्व तुकड्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्राची चौधरी या विद्यार्थिनीने काम पाहिले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्याला दिवसभरात आलेल्या अनुभवाचे कथन केले. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राची माहिती विज्ञान शिक्षिका सोनाली राणे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रशांत देवरे यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.




