एकल, समूह नृत्यातून लोककलांचा जागर, दोन्ही गटात 101 स्पर्धकांचा कलाविष्कार

जय गणेश फाउंडेशनच्या सांस्कृतिक गणेशोत्सवात रंगली स्पर्धा


Awakening of folk art through solo and group dance, 101 contestants in both groups showcased their talent भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे सुरभी नगरात नवसाचा गणपती सार्वजनिक उत्सवात दररोज सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यात एकल व समूहनृत्य कलाप्रकारात दोन्ही मिळून 101 स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी मराठी, हिंदी, बोली भाषांतील गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. त्यातून लोककलांचा जागर करण्यात आला. स्पर्धकांनी मुद्रा, पदलालित्य, चेहर्‍यावरील हावभाव, संगीताचा ताल योग्य समन्वय साधून रसिकांना खिळवून ठेवले.

1011 स्पर्धकांचा सहभाग
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एकल नृत्यात लहान गटात 27, मोठ्या गटात 14 असे 41 तर समूह नृत्यात लहान व मोठा गट असे मिळून 60 असे 1011 स्पर्धक सहभागी झाले. गेल्या 18 वर्षांपासून गणेशोत्सवात ही स्पर्धा निरंतर घेतली जाते आहे. दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद आहे.


स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धकांसोबत त्यांच्या पालकांनाही निमंत्रित केले जाते. जेणेकरून आपल्या पाल्याला कलाक्षेत्रात किती रुची आहे याचे आकलन व्हावे हा त्यामगचा उद्देश असतो. यंदा गणेशोत्सवात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना जो प्रतिसाद लाभला तो लक्षात घेता आगामी काळात ‘भुसावळ कलामहोत्सव’ घेण्याचे नियोजन असल्याचे नेमाडे यांनी सांगितले. सूत्रसंचालन साक्षी चौधरी यांनी केले. फाउंडेशनचे हर्षल वानखेडे, नचिकेत यावलकर, सुजय पाटील, विशाल आहुजा,अभिषेक वाणी, तुषार झांबरे यांच्यासह गणेशोत्सव आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

भरनाट्यम, कथ्थक, लावणीने रंगत
स्पर्धत भरतनाट्यम, कथ्थक, लावणीसह विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. कथ्थक नृत्यातून स्पर्धकांनी हात आणि बोटांच्या विशिष्ट मुद्रांचा वापर करून अनेक अर्थ व्यक्त केले. आनंद, दु:ख, राग अशा नानाविध भावना या नृत्यातून व्यक्त करण्यात आल्या. बोलीभाषांतील गाण्यांवरील नृत्यांतून लोककला संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पावासाचे वातावरण असले तरी स्पर्धक आणि आयोजकांचा उत्साह अभूतपूर्व असाच होता.

विसर्जन मिरवणुकीत लेझिम पथक
नवसाचा गणपतीची विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 10 वाजता सुरभीनगरातून निघणार आहे. ढोल-ताशे, लेझीम, झांज पथक त्यात असेल. मराठमोळ्या नृत्यासह पारंपरिक वाद्यांच्या साक्षीने ही मिरवणूक निघणार आहे. त्यात परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरीक, युवक मंडळांचे सदस्य सहभागी होतील. मिरवणूक शिस्तबद्ध व नियोजित वेळेत पूर्ण व्हावी म्हणून स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री आठ वाजता तापी नदीच्या पात्रावर विसर्जन होईल.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !