ज्येष्ठांसाठीचा कायदा त्यांना आर्थिक सहाय्य भावनिक आधार मिळवून देतो : अॅड.तुषार पाटील
पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात
The law for senior citizens provides them with financial assistance and emotional support : Adv. Tushar Patil भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन-पोषण आणि कल्याण कायदा 2007’ हा ज्येष्ठांसाठीचा मुख्य कायदा आहे. जो त्यांच्या गरजा, हक्क आणि सुरक्षेची हमी देतो. हा कायदा मुले आणि नातेवाईकांवर पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक व भावनिक देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी टाकतो. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणापासून संरक्षण करण्यासाठी कलम 27 या कायद्यात समाविष्ट आहे अशी माहिती भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ नागरीक संघाची मासिक सभा उत्साहात
भुसावळच्या पतंजली ज्येष्ठ नागरीक संघाची मासिक सभा नुकतीच पार पडली. त्यात ‘ज्येष्ठांसाठीचे कायदे’ या संदर्भात त्यांनी संवाद साधला. लोणारी हॉलच्या पाठीमागील उद्यानात असलेल्या महादेव मंदिराच्या समोर ही सभा झाली. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष टी. एस.बावस्कर होते. त्यांनी स्वत: प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित असलेले अॅड.तुषार पाटील यांचा परिचय करून दिला.

अॅड.पाटील म्हणाले की, जर ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या कमाईतून किंवा मालमत्तेतून स्वतःची काळजी घेऊ शकत नसतील, तर त्यांच्या मुलांना व नातेवाईकांना त्यांची देखभाल करणे बंधनकारक आहे. या कायद्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण’ स्थापन केले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणाही जबाबदार आहेत, विशेषतः एकाकी आणि दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष बी.जी.चव्हाण यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.
तडजोडीसाठी समेट अधिकारी
साठ वर्ष किंवा साठ वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक म्हणू हक्क मागू शकते. यात ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता जास्तीत जास्त दरमहा 10 हजार रुपयेपर्यंत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार मिळू शकतो. तडजोडीसाठी समेट अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. ते 30 दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणास आपला रिपोर्ट देऊन मुलांमध्ये पालक व आई-वडीलांमध्ये तडजोडीसाठी प्रयत्न करू शकतात असेही अॅड.पाटील यांनी नमूद केले.
नवीन सभासद जोडणी अभियान
पतंजली ज्येष्ठ नागरिक संघात वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, कायदेविषयक जनजागृती अशा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. संघाला स्वतंत्र जागा मिळावी यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. ही जागा मिळाल्यावर तेथे ज्येष्ठांसाठी पथदर्शी असे विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे रुपरेषा तयार केली आहे. त्यात लवकरच यश मिळेल. जास्तीत जास्त नवीन सभासद जोडण्याचे अभियानही हाती घेतले आहे, असे अध्यक्ष टी.एस.बावस्कर यांनी सांगितले.




