भुसावळातील बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे शिक्षक दिन उत्साहात
Teachers’ Day celebrated with enthusiasm by Biyani Education Group in Bhusawal भुसावळ (9 सप्टेंबर 2025) : शहरातील बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवार, 7 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिक्षकांनी सुंदर असे समूह नृत्य, फिल्मी गीत, विनोदी तसेच राजकीय व सामाजिक विषय मांडणार्या नाटीका आदींचे उत्कृष्टपणे सादर करीत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.






उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक असलेल्या गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच काही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. शिक्षकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर, सामाजिक, कौटुंबिक, पारंपारिक तसेच विनोदी नाटिका, समूह नृत्य याने मान्यवर तसेच प्रेक्षक भारावून गेले.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. उद्घाटक सत्यनारायण सोनी व प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या फौजदार भारती काळे, सुयश न्याती, उपाध्यक्ष विनोद बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्मिता बियाणी, रोनक बियाणी उपस्थित होते. यावेळी राजेश पारिक, प्रवीण भराडिया, सागर काळे, गोटू लाहोटी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून मनीषा काबरा, तृप्ती नागोरी हे होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आयुषी रोनक बियाणी व विद्यार्थिनी कोमल लाहुडकर व देवेश ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मानले.


