25 हजारांची लाच भोवली : वरिष्ठ महिला सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
Bribe of Rs 25,000 taken: Senior female assistant in ACB’s net सातारा (29 ऑक्टोबर 2025) : 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ महिला अधिकार्याला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. वैशाली शंकर माने (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा 24 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असून 24 वर्षे सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव तक्रारदार यांच्या शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केला होता.




या प्रस्तावाच्या मंजुरी आदेशाच्या मागणीसाठी तक्रारदार हे वरिष्ठ सहायक वैशाली माने यांना भेटले होते. त्यावेळी माने यांनी साहेबांना देण्यासाठी म्हणून 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पुणे येथील ‘लाचलुचपत’च्या पथकाने 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात सापळा रचला तसेच 25 हजार रुपयांची मागणी करून स्वीकारताना वैशाली माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.