साक्री पोलिसांची डिझेल तस्करीविरोधात मोठी कारवाई ; 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

चालकाला अटक, क्लीनर ताब्यात :  मुख्य सूत्रधारासह तिघांचा शोध सुरू


धुळे (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : डिझेल टँकरमधून अवैधरित्या डिझेलची विक्री करण्याच्या हेतूने डिझेल मानवी जीवितास धोका होईल या पद्धत्तीने काढताना साक्री पोलिसांनी कारवाई करीत ड्रायव्हरला बेड्या ठोकल्या तर क्लीनरला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या कृत्यात टँकर मालकासह तिघांचा सहभाग आढळल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आले. पोलिसांनी डिझेलसह टँकर व इतर साहित्य असा एकूण 48 लाख 5 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ओंकार गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बोडकीखडी शिवारातील ’काकाचा ढाबा’च्या आवारातील पत्र्याच्या शेडजवळ टँकर (जी.जे.15 ए.टी.3299) मधून संशयीत अवैधरित्या डिझेलची अवैध वाहतूक आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा
पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर यावेळी संशयीत टँकरचे सील न तोडता रबरी पाईपाने अवैधरित्या टँकरमधून डिझेल काढून ते दोनशे लीटरच्या टाक्यांमध्ये भरत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी टँकर चालक चंद्रप्रकाश विरेंद्रकुमार मिश्रा (32, चकलालमन, कटारा, ता.हंडिया, प्रयागराज, युपी) व क्लीनर अल्पवयीन क्लीनरला ताब्यात घेण्यात आले. या कृत्यात टँकर मालकासह तिघांचा सहभाग असल्याचे आरोपींनी स्पष्ट करताच या गुन्ह्यात सचिन जीवन मुर्तडकर (29, मिरच्या मारुती चौक, गल्ली नंबर पाच, धुळे), सलीम युसूफ खान (बाडमेर, राजस्थान) व टँकर मालक (नाव माहित नाही) यांनाही सहआरोपी करण्यात आले.

48 लाखांचा मुद्देमाल जप्त : संशयीताविरोधात सहा गुन्हे
या कारवाईत डिझेलची वाहतूक करणारा 30 लाखांचा टँकर (जी.जे.15 ए.टी.3299), 47 हजार 800 रुपये किंमतीचे नोझेल, प्लास्टिक पाईप, प्लास्टीक माप, 24 हजार रुपये किंमतीचे डिझेल असा एकूण 48 लाख पाच हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य संशयित सचिन जीवन मुंडेकर (29, रा. मिरच्या मारुती चौक, गल्ली क्रमांक 5, धुळे) याच्याविरुद्ध यापूर्वी सेंट्रल ठाणे शहर, आझादनगर, पिंपळनेर, घोटी नाशिक ग्रामीण, चाळीसगाव रोड व साक्री पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ओंकार गवळी, पोलीस उपनिरीक्षक अशोक वळवी, अंमलदार संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील, योगेश पिसे, तुषार जाधव, नारायण चव्हाण, सागर चव्हाण आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !