एक लाखांची लाच मागणी भोवली : पारोळा वनपालासह तिघांविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा
सॉ मिल चालकाला जळगाव एसीबीकडून अटक : महिला वनपालासह दुसर्या संशयीताचा कसून शोध
गणेश वाघ
Bhowli demands bribe of Rs 1 lakh: ACB files case against three including Parola forest ranger भुसावळ (29 ऑक्टोंबर 2025) : शेतातील निंबाची झाडे तोडल्यानंतर ही लाकडे ट्रकद्वारे मालेगावकडे नेत असताना वनविभागाच्या अधिकार्यांनी हा ट्रक अडवत गुन्हा दाखल करण्याची भीती घालून सुरूवातीला अडीच लाखांची लाच मागत नंतर एक लाखांवर तडजोड केली होती. या प्रकरणात पारोळा सॉ मिलचा मालक मध्यस्थी होता. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाच मागणी झाली असलीतरी संबंधितांना सापळ्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर तिघांविरोधात पारोळा पोलिसात एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तिघांविरोधात गुन्हा : सॉल मिल चालकाला अटक
लाच मागणी प्रकरणी पारोळा वनपाल वैशाली गायकवाड, पारोळ्यातील श्रीकृष्ण सॉल मिल मालक सुनील धोबी तसेच वनविभागाच्या एका कर्मचार्याविरोधात (नाव, गाव माहित नाही) पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धोबी यांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.




असे आहे लाच प्रकरण
पारोळ्यातील तक्रारदाराच्या भावाने शेतातील निंबाची झाडे तोडून ही लाकडे मालेगावात नेण्यासाठी ट्रक बोलावला मात्र सावित्री फटाक्यासमोर वनपाल गायकवाड, धोबी व वनविभागाच्या कर्मचार्याने ट्रक पकडल. 14 ऑक्टोबर 2024 हा प्रकार घडल्यानंतर हा ट्रक धोबी यांच्या श्रीकृष्ण सॉ मिलमध्ये लावण्यात आला. तक्रारदार व त्यांच्या भावाने ट्रक सोडण्याची विनंती केल्यानंतर गायकवाड व अन्य आरोपींनी सुरूवातीला अडीच लाखांची मागणी करीत एक लाखांवर तडजोड केली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र संशयीतांना सापळ्याची कुणकुण लागल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. एसीबीला लाच मागणीचा अहवाल मिळताच त्यांनी बुधवारी सायंकाळी तिघांविरोधात गुन्हा दाखल करीत धोबी यास अटक केली तर अन्य संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, नाशिक एसीबी निरीक्षक नेहा सूर्यवंशी, सहा.पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, नाईक राकेश दुसाने, नाईक बाळू मराठे, नाशिकचे हवालदार विनोद चौधरी, चालक परशूराम जाधव, नंदुरबारचे हवालदार नरेंद्र पाटील, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने केली.