हतनूर धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन : अजून आगामी आठवडाभर राहिल आवक
भुसावळ (8 डिसेंबर 2025) : हतनूर धरण 10 ऑक्टोंबरला 100 टक्के भरल्यानंतरही आवक कायम आहे. अजून आठवड्याभर धरणात अल्प प्रमाणात का असेना आवक कायम राहणार आहे. दरम्यान तापीनदीतून सोडलेल्या विसर्गामुळे शेळगाव बॅरेजमध्ये जलसाठा केला जात आहे. दरम्यान धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे यावल, चोपडा व रावेर तालुक्यातील 37 हजार हेक्टरला लाभ होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यातच भरले धरण
हतनूर धरणात 10 ऑक्टोबरला 100 टक्के जलसाठा करण्यात आला होता. यानंतरच्या काळात धरणात तापी व पूर्णा या दोन्ही नद्यांमधून आवक सुरुच आहे. यामुळे 100 टक्के जलसाठा करुन तापीनदीत पाणी सोडण्यात आले आहे. हतनूर धरणातून दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीसाठी पहिले आवर्तन दिले जाते. यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडण्यात आले. हतनूर धरणात अजून काही दिवस अल्प प्रमाणात का असेना आवक कायम राहणार आहे. यामुळे पहिले आवर्तन सोडल्यानंतरही धरणातील जलसाठा कायम राहू शकेल.




आगामी काळात किती दिवस अल्प प्रमाणात आवक राहिल. यावर साठा अवलंबून राहणार आहे. दरम्यान हतनूर धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन आगामी उन्हाळ्यातही सिंचन, प्रकल्प व पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जाइल, असे उपविभागीय अभियंता एस. जी. चौधरी यांनी सांगितले.