प्रामाणिक अधिकार्याला किती छळणार ? तुकाराम मुंढेनी सोडले मौन
How much more will they harass an honest officer ? Tukaram Mundhe breaks his silence. मुंबई (15 डिसेंबर 2025) : मी झुकलो नाही, म्हणून माझ्यावर खोटे आरोप करून सातत्याने कट रचले जात आहेत. चौकशीत ‘क्लीन चिट’ मिळूनही तेच तेच आरोप उकरून काढणे, ही एका प्रामाणिक अधिकार्याची मानसिक छळवणूक नाही का?, अशा शब्दांत वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजपाच्या आमदारांनी केले होते आरोप
तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसतानाही नियमबाह्यपणे प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतला. तसेच 20 कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा दावा, शिवाय पाच दिवसांचे बाळ असलेल्या एका महिला अधिकार्याला सक्तीने कामावर बोलावणे आणि नस्तीवर सही न केल्याने दुसर्या एका महिला अधिकार्याला अर्वाच्य भाषेत सुनावणे, असे आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके आणि प्रताप अडसड यांनी केले होते. याप्रकरणी आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान, लक्षवेधी मांडत तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या सर्वांवर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका मांडली.


माझ्यावर वारंवार जुनेच आरोप
तुकाराम मुंढे म्हणाले, मला नागपूरच्या माझ्या कार्यकाळात काम करू दिले नाही. काहींनी अनेक अडथळे आणले. खोटे आरोप करून विविध चौकश्या माझ्या मागे लावल्या. चौकशीत मी निर्दोष आढळलो. तरी माझ्यावर तेच आरोप वारंवार करण्यात आले.
कामासाठी एका नेत्याचा दबाव
महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या नोकरी करत असलेल्या 17 कर्मचार्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर प्रचंड दबाव आणला होता मात्र हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने मी सही करण्याऐवजी त्याची खात्यांतर्गत चौकशी लावली.
आमदाराच्या नातेवाईकावर कारवाई केल्यानेच कट
शासनाच्या नियमाप्रमाणे केलेल्या या चौकशीत या 17 जणांची नोकरी बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आणि मी त्यांना बडतर्फ केले. विशेष म्हणजे यात एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचाही समावेश होता त्यामुळेच त्या आमदाराचा ईगो दुखावला गेला आणि त्यांनी माझ्याविरोधात मोहीम उघडली, असे तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
महिलांना पुढे करून बदनामीचा कट
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, मी दबावाला बळी पडलो नाही, म्हणून काही महिलांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. ज्या प्रकरणांमध्ये मला आधीच ‘क्लीन चिट’ मिळाली आहे, तीच जुनी प्रकरणे उकरून काढून मला त्रास दिला जात आहे. नागपुरात काम करताना मी कोणाचीही मनमानी चालू दिली नाही, याचीच ही शिक्षा मला दिली जात आहे. एका प्रामाणिक अधिकार्याला नक्की किती त्रास द्यायचा, याला काही मर्यादा आहेत की नाही? असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला.







