धुळ्यातील मोहाडी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई : एक कोटींचा विनापरवाना मद्याचा साठा जप्त
सातार्याकडून इंदौरकडे वाहतूक होत असताना कारवाई : मध्यप्रदेशातील चालकाला बेड्या : रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
Biggest operation by Mohadi police in Dhule : Unlicensed liquor stock worth one crore seized धुळे (19 जानेवारी 2026) : धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी सातार्याकडून इंदौरच्या दिशेने मद्याची विनापरवाना होणारी वाहतूक रोखत सुमारे एक कोटींची दारू जप्त केल्याने अवैध मद्य तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुकेश नाथु प्रजापती (38, धानी कचावदा, ता.धरमपुरी, जि.धार, मध्यप्रदेश) या चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या कबुली जवाबानंतर या प्रकरणातील रॅकेट समोय येण्याची शक्यता आहे. मोहाडी पोलिसांच्या दबंग कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना बातमीदाराकडून अवैधरित्या मद्य तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह पथकाला सापळा रचला. रविवार, 18 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लळींग टोल नाक्याजवळ संशयीत ट्रक (एम.एच.23 ए.यु.7042) चा शोध सुरू करण्यात आल्यानंतर हे वाहन मालेगावकडून धुळेमार्गे जात असतानाच लळींग टोल नाक्यापुढे धुळ्याकडे येणारे रस्त्यावर जय मल्हार चहाच्या टपरीसमोर रोडावर ट्रक दिसताच चालकाला ताब्यात घेण्यात आले मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पंचांसमक्ष ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यात अवैध मद्यसाठा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.

एक कोटींचा मुद्देमाल जप्त
दहा लाख रुपये किंमतीचा ट्रक (एम.एच.23 ए.यु.7042) तसेच 92 लाख 16 हजार रुपये किंमतीची गोवा व्हिस्कीचे एकूण 1500 बॉक्स जप्त करण्यात आले. दारु वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, नितीन करंडे, पोलीस अंमलदार सचिन वाघ, जितेंद्र सैंदाणे, श्रीकांत निकुंभे, चेतन झोळेकर, पवन थोरात यांच्या पथकाने केली.







