जळगाव जिल्ह्यातील चैन चोरीचे 16 गुन्हे उघड : भुसावळातील इराणी टोळीकडून 40 लाखांच्या सोन्यासह 16 दुचाकी जप्त
इराणी टोळीचा राज्यात धूमाकुळ : जिल्ह्यातील दुचाकी चोरींचे गुन्हेदेखील उघड
Sixteen chain snatching cases in Jalgaon district uncovered : 16 two-wheelers along with gold worth 40 lakhs seized from an Irani gang in Bhusawal जळगाव (19 जानेवारी 2026) : जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात चैन चोरीचे गुन्हे करणार्या भुसावळातील इराणी टोळीचा भुसावळातील बाजारपेठ पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मध्यप्रदेशात झालेल्या गुन्ह्यात आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी मुस्लीम कॉलनीत कोम्बिंग केले. यावेळी 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या तसेच 40 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती जळगाव पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, 19 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत देत पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.
भुसावळात पोलिसांवर झाला होता हल्ला
15 जानेवारी रोजी मध्यप्रदेशातील बडोद पोलीस ठाण्याचे पथक करारअली हुजूर अली या आरोपीला पकडण्यासाठी भुसावळात आल्यानंतर जुल्फिकार अली उर्फ श्री इराणी याच्या घराजवळ 15 ते 20 महिला आणि पुरुषांच्या जमावाने पोलिसांना घेरले. जमावाने जिल्हाधिकार्यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत पोलिसांवर विटा आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. काही महिलांनी पोलिसांना पकडून त्यांचा चावा घेतला तर काहींनी तुमची नोकरी घालवू , अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते.

कोंबिंग ऑपरेशन व 40 लाखांचे सोने जप्त
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि बाजारपेठ पोलिसांनी मुस्लीम कॉलनी परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. घरझडती दरम्यान मरियम बी.जाफर अली जाफरी आणि नाझिया टिपू शेख यांच्या घरातून 287.7 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लग्गडी सापडल्या. चौकशीत दोघांनी धक्कादायक खुलासा केली की, या टोळीतील हसनअली ऊर्फ आसू, मजहर अब्बास जाफर इराणी, हसनैन अली जाफर अली इराणी, अब्बास ईबादत शेख इराणी, सादिक उर्फ आतंक, ईबादत अली उर्फ मुस्तफा अली आदींनी जळगाव जिल्हा, अमरावती आणि मध्यप्रदेशात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून आणले होते. या दोन महिला ते दागिने वितळवून सोन्याच्या लग्गडी तयार करत असत. संशयीत महिलांच्या घरातून 287.7 ग्रॅम वजनाचे व 40 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
आरोपीकडून पिस्टल व काडतूस जप्त
कारवाईदरम्यान मजहर अब्बास जाफर इराणी याच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
चोरीच्या 16 दुचाकी जप्त
कोम्बिंगदरम्यान आरोपींच्या घराबाहेरून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 16 मोटारसायकलीही पोलिसांनी हस्तगत केल्या. या टोळीने आतापर्यंत जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा आणि अमळनेर येथील तब्बल 16 गुन्ह्यांची कबुली दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, बाजारपेठ उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, रमण सुरळकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, अतुल पवार, नाईक सोपान पाटील, शिपाई प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, अमर अढाळे, हर्षल महाजन, महेंद्र पाटील, जीवन कापडे, जावेद शहा, सचिन चौधरी, सागर वंजारी, दिलीप कोल्हे, मोहसीन शेख, सीमा चौधरी, प्रियंका भोसले, सीमा चिखलकर, गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक कल्याणी पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींच्या पथकाने केली.







