!-- afp header code starts here -->

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू


Comrade Govind Pansare murder case सांगली (20 जानेवारी 2026) : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि ‘सनातन संस्थेचा’ साधक समीर गायकवाड याचा मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. चार वर्षांपासून तो जामिनावर बाहेर होता. गायकवाडच्या मृत्यूमुळे पानसरे हत्या प्रकरणाचा खटला आणि पुढील तपासासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

चार वर्षांपासून आरोपी जामिनावर
समीर गायकवाड सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती वेगाने बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि मंगळवारी पहाटे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल.

काय आहे पानसरे हत्या प्रकरण?
ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कोल्हापूर ‘एसआयटी’कडे होता मात्र पानसरे कुटुंबीयांच्या मागणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2022 मध्ये हा तपास ‘एटीएस’कडे सोपवला. 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांच्यासह 10 संशयितांवर हत्येचा कट रचणे आणि हत्या करणे याप्रकरणी आरोप निश्चित केले होते. या प्रकरणातील सर्व 12 संशयितांना सध्या न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. खटल्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू झाला आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !