यावलमध्ये मृताला जिवंत भासवत तीन हेक्टर शेतजमिनीची विक्री : मुंबईतील 12 संशयीतांविरोधात गुन्हा
In Yaval, three hectares of agricultural land were sold by falsely presenting a deceased person as alive: a case has been registered against 12 suspects from Mumbai. यावल (21 जानेवारी 2026) : मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून आणि तो व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून सुमारे तीन हेक्टर 19 आर शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार यावलमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी जालन्यातील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ, नवी मुंबई, वसई आणि यावल येथील एकूण 12 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण
तक्रारदार कांचन संजय खत्री (52, रा.जालना) यांचे काका गेलाराम भुरोमल यांच्या नावे यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथे गट क्र. 193 मध्ये मोठी शेतजमीन होती. गेलाराम यांचा मृत्यू 1 जानेवारी 1995 रोजी झाला होता मात्र आरोपी अजित तुळशीराम भंडारी (अंबरनाथ) याने मृत गेलाराम यांच्या जागी श्याम मनोहर मुंदडा (वसई) याला बनावट ‘गेलाराम’ म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. त्यांचे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून ही जमीन 11 लाख 15 हजार रुपयांत लाटली.

नियोजनबद्ध व्यवहार
या घोटाळ्यात आरोपींनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या व्यवहार केले. बनावट खरेदीखताच्या आधारे सदर जमिनीचे दोन तुकडे करून 1 हेक्टर 45 आर.जमीन आरोपी सकूबाई धनगर हिच्या नावे तर उर्वरित एक हेक्टर 74 आर जमीन प्रशांत पाटील याने स्वतःच्या नावावर करून घेतली. या प्रक्रियेत नवी मुंबई आणि विरार येथील आरोपींनी खोटे साक्षीदार म्हणून स्वाक्षर्या केल्या तर स्थानिक आरोपींनी जमीन मालकाची खात्री न करता या गुन्ह्यात संगनमत केले.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी अजित तुळशीराम भंडारी (ठाणे), श्याम मनोही मुंदडा (पालघर), सचिन हेमचंद राऊत (नवी मुंबई), उमेश चंद्रकांत कदम (41), सकूबाई दशरथ धनगर, शांताराम दशरथ धनगर, रवींद्र दशरथ धनगर, ईश्वर यशवंत पाटील, दिलीप लक्ष्मण धनगर (सर्व रा.बोरावल खुर्द, ता.यावल), किशोर सुरेश माळी आणि शेख युसूफ शेख फारुख (यावल) अशा 12 जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत.







