एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणाने तरुणीला संपवत फासाला लटकवले
नागपूर (22 जानेवारी 2026) : पत्नीसोबत शिवणकामाचे शिक्षण घेणार्या तरुणीवर शेजारच्याचा जीव जडला मात्र त्याची नजर तिने ओळखत अंतर राखण्यास सुरूवात केली मात्र संतप्त तरुणाने वादानंतर थेट तरुणीची गळा आवळून हत्या केली व खून उघडकीस न येण्यासाठी तरुणीला गळफास देत लटकवले मात्र तपासात हा प्रकार हत्येचा समोर आला. नागपूरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी येथे हा प्रकार घडला. प्राची खापेकर असे मृत तरुणीचे नाव असून शेखर ढोरे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय घडले नागपूरात ?
प्राची खापेकर ही गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. ती बी.ए.चे शिक्षण घेत होती. त्याचसोबत आरोपी शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर शिवणकामाचे कामही करत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.




आधी केली हत्या नंतर दिले आत्महत्येचे स्वरूप
हीच गोष्ट शेखरला सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी प्राचीच्या घरात कोणीही नसताना तो तिच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून तिची हत्या केली. प्राचीचा मृत्यू झाल्याची खात्री होताच, शेखरने ओढणीचा फास बनवून तिचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकावला आणि आत्महत्येचा बनाव रचत घटनास्थळावरून फरार झाला.
सुरुवातीला आत्महत्येचा संशय
काही वेळाने प्राचीचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ मानकापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे तसेच गळ्यावर खुणा आढळून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.