‘नॉट रिचेबल’ सरिता म्हस्केंचा खळबळजनक खुलासा : फोन बंद येण्यामागील कारणही सांगितले
मुंबई (22 जानेवारी 2026) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल झाल्याने विविध चर्चा व अफवांना ऊत आला होता. मात्र अखेर म्हस्के माध्यमांसमोर आल्या असून त्यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
म्हस्केंचा खळबळजनक खुलासा
एका बड्या नेत्याने राजकीय स्वार्थासाठी आपल्याला पळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हुलकावणी देऊन मी नवस फेडण्यासाठी तुळजापूरला गेले होते, असा खळबळजनक खुलासा म्हस्के यांनी केला आहे. बुधवारी मध्यरात्री त्यांनी थेट आमदार मिलिंद नार्वेकर यांचे निवासस्थान गाठल्याने ठाकरे गटाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.




शिंदे गटात प्रवेशाची होती चर्चा
महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 157 मधून सरिता म्हस्के विजयी झाल्या. बुधवारी सकाळी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला डॉ.सरिता म्हस्के गैरहजर होत्या. इतकेच नव्हे तर कोकण भवन येथे पक्षाचा ‘गट’ नोंदवण्यासाठी सर्व नगरसेवक गेले असतानाही म्हस्के तिथे पोहोचल्या नव्हत्या. त्यांचा फोन बंद असल्याने त्या शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच तिथे प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र डॉ.सरिता म्हस्के या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत.
काय म्हणाल्या सरिता म्हस्के?
बुधवारी दिवसभर घडलेल्या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सरिता म्हस्के म्हणाल्या, निवडणुकीत विजय मिळाल्यास तुळजाभवानीचा नवस फेडायचा असे मी ठरवले होते. निकालानंतर मी तातडीने तुळजापूरला गेले. तिथे मोबाईलला रेंज नसल्याने मुंबईत काय गोंधळ सुरू आहे, याची मला कल्पना नव्हती.्र
थेट मुंबई गाठली
सरिता म्हस्के म्हणाल्या, मोबाइल सुरू होताच सर्व गोष्टींचा उलगडा झाला त्यामुळे तातडीने मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. आळेफाट्याजवळील बेल्डा आणकुटी येथील म्हस्के वाडीत आज पालखी होती. आम्ही तेथेही जाणार होतो, परंतु मुंबईतील घडामोडी लक्षात घेऊन बुधवारी मध्यरात्री थेट मुंबई गाठली. मुंबईत येताच घरी न जाता मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचलो. त्याच्या निवासस्थानी विश्रांती केली.
शिंदे गटाच्या नेत्याबाबत खळबळजनक खुलासा
शिवसेनेतील एका बड्या नेत्याने मला पुन्हा आपल्या पक्षात नेण्यासाठी आणि पळवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र त्यांना चकवा देऊन मी तुळजापूर गाठले, असा दावा देखील सरिता म्हस्के यांनी लोकसत्ता या वृत्तपत्राशी बोलताना केला.