भुसावळातील सेवेकर्याची हत्या : चेहर्यावरील मारहाणीचे व्रण व व्हिडिओ पुराव्यामुळे उकलले खुनाचे गुढ
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भुसावळात पत्रकार परिषदेत माहिती
गणेश वाघ
भुसावळ (1 जुलै 2026) : भुसावळातील रेल्वेच्या निर्जन परिसरात 55 वर्षीय सेवेकर्याची अज्ञातांनी मारहाण करीत हत्या केली होती. प्रत्यक्षदर्शी कुठलाही तांत्रिक वा भौतीक पुरावा नसताना वा मृताचे कुणाशीही वैर नसताना शहरात झालेल्या हत्येनंतर शहर पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते मात्र पीएम रिपोर्टमध्ये मृताला ज्या पद्धत्तीने मारहाण करण्यात आली ती एखादा बॉडीबिल्डर, बॉक्सर अथवा खेळाडू असू शकतो या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले शिवाय याचवेळी एका हळदीच्या कार्यक्रमातील हाणामारीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी ‘क्लू’ जुळवत तीन संशयीतांना अटक केली. त्यातील एक संशयीत अट्टल गुन्हेगार व बॉक्सर असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बुधवारी दुपारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
काय आहे प्रकरण ?
भुसावळ शहरातील रेल्वेच्या लष्करी डेपोमागील डाऊन रेल्वे लार्ठनजवळ कालिका माता मंदिराजवळ संतोष रघुवीर मंचल (55) यांची मारहाण करीत हत्या करण्यात आली. रविवारी मध्यरात्री हत्या झाली असलीतरी खुनाची घटना समोर येण्यास सोमवारची दुपार उजाडली. शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली. कौटुंबिक वादातून हत्येचा प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अन्य अँगलने तपासाला वेग दिला.


अपर पोलिस अधीक्षकांच्या सुक्ष्म नजरेने मिळाला पहिला ‘क्लू’
मृत संतोष मंचल यांच्या मृतदेहाचे ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल समोर आल्यानंतर जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी त्याचे बारकाईने अवलोकन केल्यानंतर रिपोर्टमध्ये जबड्यांवर व बरगड्यांवर मारहाण झाल्याने मंचल यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट णाले. मारेकरी एखादा बॉडीबिल्डर, बॉक्सर अथवा खेळाडू असावा ! असा निष्कर्ष गावीत यांनी काढल्यानंतर तपासाचा वेग वाढवला.
‘तो’ व्हिडिओ अन् बॉक्सर अडकला जाळ्यात
खुनाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील एका कर्मचार्याला खुनाच्या रात्री म्हणजेच 28 जून रोजी रात्री एका ‘हळदी’च्या कार्यक्रमात वाद झाल्यानंतर या वादात एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली व त्या व्हिडिओत मारहाण करणारा हर्षल राजू वर्मा जो बॉक्सर म्हणून परिचीत आहे त्याचे नाव समोर आले. हर्षल वर्माचह गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्या रात्रीची त्याची संशयास्पद हालचाल लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत त्यास ताब्यात घेत बोलते केल्यानंतर त्याने विविध खोट्या कहाण्या सांगितल्या मात्र पोलिसांच्या अचूक नजरेत तो उघडा पडला व त्याने अखेर घटनाक्रम उलगडला व सोबतच्या अन्य दोन संशयीतांची नावेही सांगितले.
सहा हजारांचे लोखंड विकले : पुन्हा चोरी करताना खून
घटनेच्या दिवशी आरोपींनी एका शाळेच्या आवारातून भंगार चोरून त्यातून सहा हजार रुपये कमवले मात्र पैशांची भूक अस्वस्थ करीत असल्याने आरोपींनी पुन्हा रेल्वेच्या निर्जन परिसरात पाय ठेवला. चोरीसाठी जात असताना तिथे संतोष मंचाल आले व त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात बॉक्सर असलेल्या हर्षल वर्मा याने मंचाल यांच्या चेहर्यावर जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.
त्रिकूटाला अटक : आरोपींना 4 पर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी खून प्रकरणी हर्षल राजू वर्मा (19), क्षितीज संजय भालेराव (19) व प्रफुल्ल उत्तम जाधव (21) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हर्षलची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली. आरोपींना बुधवार, 1 रोजी न्यायालयात हजर केले असता 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली खुनाच्या गुन्ह्याची उकल
खुनाच्या गुन्ह्याची उकल जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, शहर निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार व बाजारपेठ तसेच शहर ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचार्यांनी केली.
