भुसावळातील पत्रकारांतर्फे खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध
व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुकातर्फे प्रांतांना निवेदन : खासदारावर कठोर कारवाईची मागणी
भुसावळ (1 जुलै 2026) : मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत अत्यंत अपमानास्पद वक्तव्य करीत धमकीची भाषा वापरल्याचा व्हॉईस ऑफ मिडीयाच्या भुसावळ तालुका वतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी खासदार संजय पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे पदाधिकार्यांनी केली.
माध्यमांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जवाबदारी
पत्रकारांचा सन्मान राखणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे असल्याचे निवेदनात नमूद आहे. एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही केवळ त्या पत्रकाराची नव्हे तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राची अवहेलना आहे. लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा वापरली गेल्यास समाजात पत्रकारांविषयी चुकीचा संदेश जातो. अशा विधानांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होतो, त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि मुक्त व निर्भीड पत्रकारितेच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता आणि माध्यमांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.


खासदारांवर दाखल करा गुन्हा
खासदारांच्या अपमानास्पद वक्तव्याची शासनाने तातडीने गंभीर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, संबंधित खासदारांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी, त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात पत्रकारांचा अवमान करणार्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे धोरण शासनाने जाहीर करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग राज्य कार्यकारिणी जनसंपर्क प्रमुख उज्वला बागुल, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रेम परदेशी, पदाधिकारी श्याम गोविंदा, सुनील आराक, कैलास उपाध्याय, किशोर शिंपी, विनोद गोरधे, आकाश ढाके, कलीम पायलट, राजू चौधरी, सतीश कांबळे, राजेश तायडे, धम्मरत्न गणवीर, हबीब चव्हाण, अभिजीत आढाव, अझहर शेख, मजहर शेख, जोहेब सैय्यद आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आल्या.
