!-- afp header code starts here -->

हवे तर मला सस्पेंड करा मात्र बाबासाहेबांना संपवायचं काम करायचे नाही : नाशिकमध्ये महिला अधिकार्‍याचा संताप


नाशिक (26 जानेवारी 2026) : नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले मात्र येथील कार्यक्रमात संविधान पुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आपल्या भाषणात न घेतल्याने वन विभागाच्या माधवी जाधव नामक महिला अधिकार्‍याने संतप्त होत या प्रकाराचा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. मी मातीकाम करेन, मला हवं तर सस्पेंड करा पण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत, असे या महिला अधिकार्‍याने ठणकावून सांगितले. महिला अधिकार्‍याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर सोमवारी तुफान व्हायरल झाल्याचे दिसून आले.

काय घडले नाशिकमध्ये ?
नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचार्‍याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गिरीश महाजनांना जाब विचारणार्‍या महिला कर्मचार्‍याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महिला अधिकारी संतप्त : पालकमंत्र्यांना सुनावले
या घटनेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. जो व्यक्ती संविधानाला कारणीभूत आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. मंत्र्यांची चूक आहे. मी माफी मागणार नाही. मंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही.

कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता संविधानामुळे आहे. पण, जे लोकं संविधानाला कारणीभूत नाहीत, लोकशाहीला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली. मात्र जे संविधानाला कारणीभूत आहेत, प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव का घेतलं जात नाही, असे म्हणत महिला पोलीस कर्मचार्‍याने तीव्र भावना व्यक्त केल्या. या पोलीस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दिलगिरी व्यक्त करतो : गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !