अभिनेते सयाजी शिंदेंचे परखड विधान ; कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही!
Actor Sayaji Shinde’s blunt statement: No color belongs to anyone’s father! पुणे (26 जानेवारी 2026) : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी मुंब्रा हिरवा करण्याचे विधान अलीकडे वादाचे कारण ठरले असतानाच या विधानावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे असल्याचे ते म्हणाले.
मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा
ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी ‘कैसा हराया’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते. यावेळी त्यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवे करण्याचीही घोषणा केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहर शेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून देत या प्रकरणावर पडदा टाकला. या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणावर वरील परखड प्रतिक्रिया दिली आहे.

कुणाला आव आणून रंग तयार करता येत नाही
सयाजी शिंदे सोमवारी जुन्नर तालुक्यात देवराईच्या कामानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, निसर्गामध्ये सगळे रंग आहेत. ते कुणाला आव आणून तयार करता येत नाहीत. कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत. महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरू करत आहे. संताचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या एक हजार झाडे लावण्यात आली आहे. आणखी 10 हजार झाडे आम्हाला इथे लावायची आहेत. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
राजकारणात आपल्याला रस नाही
तपोवनाची जागा सोडून त्यांनी कुठेही कुंभमेळा करावा. कुंभमेळा ही सुद्धा चांगली परंपरा आहे. पण झाडांची परंपरा ही त्याहून अधिक चांगली आहे. मला राजकारणातील फारसे कळत नाही. त्यात मला रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण सुरू आहे. ते आजही सुरूच आहे. त्यात काहीही नवीन नाही, असेही सयाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.







