पाळधीजवळ भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक : सहा वर्षीय नातवासह आजोबा ठार
Speeding tractor collides with a motorcycle : Grandfather and his six-year-old grandson killed पाळधी (27 जानेवारी 2026) : दुचाकी आणि भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भीषण धडकेत आजोबांसह त्यांचा अवघ्या सहा वर्षांचा नातू जागीच ठार झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बायपासवरील कढोली फाट्याजवळ घडला.
ट्रॅक्टरच्या धडकेने अपघात
देशमुख चुनीलाल राठोड हे आपली पत्नी बेबीबाई राठोड आणि नातू परेश राठोड यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. नुकत्याच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी ते जळगावला आले होते. काम पूर्ण करून तिघेही दुचाकीने आपल्या गावी परतत असताना समोरून येणार्या भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला.

चालकाला पळताना पकडले
या अपघातात बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले. ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्याला पाळधी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.







