काटेवाडीत महिलांना अश्रूं अनावर : ‘वाघा’ला अखेरचा सलाम


Women in Katewadi were overwhelmed with tears: A final salute to ‘Wagh’. काटेवाडी (29 जानेवारी 2026) : अत्यंत हृदयद्रावक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बारामतीहून त्यांच्या मूळ गावी, काटेवाडीत आणल्यानंतर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला.
आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला… आमचा देवच गेला! अशा शब्दांत काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहो फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता… ओ साहेब, थांबा ना, आमच्या दादांना असे नेऊ नका, तुमच्या पाया पडतो! हे काळीज पिळवटून टाकणारे शब्द होते काटेवाडीतील त्या कार्यकर्त्यांचे, जे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना अक्षरशः रुग्णवाहिकेसमोर आडवे होत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव जेव्हा काटेवाडीतील निवासस्थानावरून विद्या प्रतिष्ठानकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसागराचा संयमाचा बांध फुटला.

नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी गर्दी
अजित पवार यांचे पार्थिव सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आणण्यात आले. दादांना आपल्या गावच्या मातीची आणि इथल्या माणसांची प्रचंड ओढ होती; सण-उत्सव ते नेहमी इथेच साजरे करायचे त्यामुळेच आज जेव्हा त्यांचे पार्थिव घराबाहेर आले, तेव्हा लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली. ही गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.

रोहित पवारांनी केले शांतता राखण्याचे आवाहन
रोहित पवारांनी सावरली परिस्थिती गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांना स्वतः बंगल्याच्या गेटवर चढावे लागले. त्यांनी दोन्ही हात जोडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी रांगा लावून एक-एक करून नागरिकांना दर्शनासाठी आत सोडले.

आमच्या वाघाला सलाम
अजितदादांना निरोप देताना काटेवाडीतील महिलांची अवस्था बघवत नव्हती. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता, आज आम्ही बहिणी आमच्या या वाघाला सलाम करतो, असे बोलताना या महिलांच्या हुंदक्यांनी उपस्थितांची मने हेलावली. ज्या नेत्यावर आजवर हक्काने रागवलं, ज्यांच्याकडे हक्काने कामं मागितली, तो ‘दादा’ आज कायमचा शांत झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !