वेल्हाळे बंडात काम करणार्यांना स्थानिकांना रोजगार द्या : सुनील काळे
Provide employment to locals who worked in the Velhale rebellion : Sunil Kale वरणगाव (2 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे राख बंडात वर्षानुवर्षे काम करणार्या वरणगांव व परिसरातील स्थानिक ट्रॅक्टर कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह पदाधिकार्यांनी केली.
स्थानिकांवर बेरोजगारीची वेळ
वरणगाव व परिसरातील अनेक स्थानिक ट्रॅक्टर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून विल्हाळे राख बंडात प्रामाणिकपणे व कष्टाने काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र सध्या बाहेरगावाहून आलेले कंत्राटदार कंत्राटे घेऊन मोठ्या प्रमाणात लाभ मिळवत असून, स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
वर्षानुवर्षे घाम गाळणारे स्थानिक ट्रॅक्टर कामगार आज हतबल झाले असून त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
शासनाच्या नियमानुसार प्रति टन 193 रुपये दराने राख अनलिमिटेड स्वरूपात स्थानिक ट्रॅक्टर कामगारांना उपलब्ध करून दिल्यास स्थानिकांच्या हाताला काम मिळेल, त्यांचे उपजीविकेचे साधन सुरू राहील व परिसरातील अनेक कुटुंबे संकटातून बाहेर पडतील.
वरणगांव व परिसरातील ट्रॅक्टर कामगारांवर आलेले हे उपासमारीचे संकट आपण निश्चितच दूर कराल आणि स्थानिकांचे हात बळकट कराल, असा विश्वास निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उर्जा मंत्री, महाराष्ट्र, व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती, मुंबई तसेच कार्यकारी संचालक महानिर्मिती, मुंबई तसेच मुख्य अभियंता (सं.व.सु) औष्णिक विद्युत केंद्र, भुसावळ यांना देण्यात आली आहे.


