खडसेंच्या कुटुंबात अनेक पदे दिली : चंद्रकांत पाटील
मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून पक्ष मोठे करण्यात त्यांचे निश्चित मोठे योगदान असून नाथाभाऊंना व त्यांच्या कुटुंबाला पक्षाकडून खूप काही मिळाले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावणकुळे यांना तिकिट द्यावं यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात ते फार महत्वाचे नेते आहेत. मात्र त्यांना केंद्रातील वरिष्ठांनी तिकिट नाकारलं, खडसे यांना का नाकारलं असं त्यांना विचारण्याइतके आम्ही मोठे नाही, असेही ते म्हणाले.
विद्यमान खासदारांचे तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी
चंद्रकांत पाटील म्हणाले की, रावेरचे सीटिंग खासदार हरीभाऊ जावळे यांचं घोषित केलेलं नाव मागे घेऊन खडसे यांच्या सुनेला तिकिट देण्यात आले शिवाय खडसे यांची कन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची चेअरमन असून त्यांच्या पत्नी महानंदाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाला देखील पक्षानं तिकिट दिलं होतं. यामुळं केंद्राने असा विचार केला असेल की किती द्यायचं यांना? असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


