खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा : अजितदादांकडे भाजपाच्या घोटाळ्याची फाईल होती !
MP Sanjay Raut’s sensational claim: Ajit Pawar had a file containing details of BJP’s scams! मुंबई (2 फेब्रुवारी 2026) : अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झाल्यानंतर मृत्यूनंतर अनेक चर्चा व दावे केले जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करीत खळबळ उडवून दिली आहे. अजितदादांकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल होती, असे ते म्हणाले. शिवाय अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात आहे की घातपात? अशी शंका उपस्थित करत राऊतांनी या प्रकरणाला ‘जस्टीस लोहिया’ प्रकरणाची जोड दिली आहे.
विमान अपघाताची बाब रहस्यमय
अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार स्वगृही परतणे हा भाजपसाठी मोठा पराभव ठरला असता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 15 जानेवारी रोजी दादांनी जाहीरपणे सांगितले होते की, ‘माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी उघड करीन.’ त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत त्यांच्या विमानाचा अपघात होणे हे अत्यंत रहस्यमय आहे. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले पाच प्रश्न गंभीर असून हे प्रकरण ‘जस्टीस लोहिया’ प्रकरणासारखे संशयास्पद वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.
अजितदादांचा पक्ष आता ‘पटेलां’चा आणि ‘शहां’चा
प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षपदावरून पियुष गोयल यांनी घेतलेल्या ‘यू-टर्न’वर राऊतांनी टोला लगावला. अजित पवारांचा पक्ष आता पवार किंवा पाटलांचा राहिलेला नाही. अमित शहांनी डाके टाकून तो पक्ष ताब्यात घेतला आणि आता तो पटेल, गोयल, शहा आणि मोदींचा झाला आहे. महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपणार्या पक्षाला भाजपने गिळून टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली.
फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय
अजित पवारांनी फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केली नसेल, याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. त्यांना स्वगृही जायचे असेल तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूनी आहे. अशावेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहीत आहे, असे संजय राऊत म्हणालेत.


