पाच हजारांची लाच भोवली : पाचोरा उपकृषी अधिकार्यासह तिघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Taking a bribe of five thousand rupees proved costly: Three people, including the Pachora Sub-Agricultural Officer, were caught in the net of the Jalgaon ACB भुसावळ (3 फेब्रुवारी 2026) : शेती साहित्यावर मिळणारी सबसीडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकार्यासह तिघांना जळगाव एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
उपकृषी अधिकारी लिलाधर शिवाजीराव देशमुख तसेच खाजगी व्यापारी संजय प्रभाकर पाटील व पंटर नितीन इंदलसिंग निकम अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
आंबेवडगाव, ता.पाचोरा येथील शेतकर्याने शासन योजनेअंतर्गत नांगर आणि रोटर खरेदी केले होते. या साहित्यावर शासनाकडनू सबसीडी (अनुदान) मिळत असल्याने त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला. साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करून अनुदान मंजूर करून देण्यासाठी उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी सहा हजारांची लाच मागितली व पाच हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला.
तिघांना केली अटक
देशमुख यांनी लाचेची ही रक्कम आंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचे मालक संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितल्याने तक्रारदार दुकानावर गेले मात्र संजय पाटील दुकानावर नसल्याने त्यांच्या सांगण्यावरून दुकानातील मदतनीस नितीन निकम याने पाच हजारांची लाच स्वीकारल्याने त्यास अटक करण्यात आली व नंतर दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, चालक सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.







